“फ्रॉइड काय, मार्क्स काय, नेहरू काय किंवा इतर विचारवंत काय, सर्वाचेच विचार कालग्रासितच असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतु अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’’ - कॉ. नारायण देसाई
नारायण देसाई यांच्या निधनाच्या घटनेचे गोव्यातील दैनिकांत वृत्तांकन

दै. गोमन्तक : सोमवार 6 ऑगस्ट 2007: पहिल्या पानावर

दै. नवप्रभा : सोमवार 6 ऑगस्ट 2007: पहिल्या पानावर

दै. सुनापरान्त (कोंकणी दैनिक) :
सोमवार 6 ऑगस्ट 2007:
पहिल्या पानावर

दै. नवहिंद टाइम्स (इंग्रजी दैनिक) :सोमवार 6 ऑगस्ट 2007: तिसर्‍या  पानावर

धगधगणर्‍या विचारांचा शांतशीतल ‘युगदीप’

(कॉ. नारायण देसाई यांच्या निधनानंतर पणजी-गोवा येथून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवप्रभा’ मध्ये तत्कालीन संपादक श्री. सुरेश वाळवे यांनी वरील शीर्षकाचा अग्रलेख दि. 7-8-2007 रोजी लिहिला होता. यात काही माहिती तसेच देसाईंच्या स्वभावाविषयीची टिप्पणी महत्त्वाची वाटली.)

...देवाधर्मावर विश्‍वास नसला तरी ‘फळाची अपेक्षा न बाळगता तू तुझे कार्य करीत रहा’ या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर असलेली त्यांची श्रद्धा. कंपूशाही करणे, आपले घोडे पुढे दामटणे, पित्त्यांमार्फत वर्णी लावून घेणे असले त्यांच्या स्वभावात नव्हते. विचार जहाल; पण माणूस स्वभावाने अत्यंत मवाळ. व्यक्तिमत्त्व नजरेत भरणारे नव्हते; पण बुद्धिमत्तेची झाक चेहर्‍यावर विलसत असायची. बोलणे शांत अन् स्वभाव सौम्य. एकटा का ते साम्यवादाच्या प्रभावाखाली आले; मागे हटले नाहीत.
... अनेक नास्तिक ‘संध्याछाया भिवविती ह्रदया’ असे झाल्यानंतर आस्तिक बनतात. कॉ. देसाई यानी मात्र एकदा का ईश्‍वराला सोडचिठ्ठी दिली ती दिली.
....................................
....पोर्तुगीज, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, स्पॅनिश आदी भाषांचे ज्ञान होते. देसाई यांची देशविदेशात व्याख्याने झाली, वाखाणली गेली.
....................................
त्यांनी ‘कंगाल भारत’ व ‘क्रांतिवीर’ ही नाटके लिहिली. ती पोर्तुगीजांविरुद्ध उठावास उद्युक्त करणारी असल्याने गोर्‍या सरकारने बंदी घातली. ‘सारीक’ व ‘युगदीप’ अशी दोन नियतकालिके त्यांनी संपादित केलीच; ‘सोविएत देस’ हे कोकणी नियतकालिकही ते काढत. अन् तेे रोमीमध्ये असे,÷ अशी आठवण काल ज्येष्ठ पत्रकार फ्लावियन डायस यांनी सांगितली.
...................................
ते सुरवातीस शिक्षक होते. पण कम्युनिझमची दीक्षा घेतल्यानंतर साहित्यविचाराला पुरेसा वेळ मिळेना. त्या काळात लिहिलेली एक कादंबरी समाधान न झाल्यामुळे आपण जाळून टाकल्याचे ते सांगत.
..................................
‘मार्क्सवादच का?’ हा ग्रंथ त्यानी सूदनचंद्र या टोपणनावाने लिहिला होता.
.................................
त्यांच्या ‘मूलगामी मूर्तिमंत’चे वर्णन त्या काळात ‘प्रज्ञेला चालना देणारा ग्रंथ’ या शब्दात झाले होते.
................................
....1961 हे जवळजवळ संपूर्ण साल त्यांनी गोवा सैन्यबळाने मुक्त करण्याच्या मागणीसाठी वेचले होते.
................................
‘लोकसंग्राम’,‘आमचे श्रम’, ‘आमचे राज्य’, ‘लोकभारत’, ‘लोकभूमी’ आदी नियतकालिके काढून त्यानी शेतकरी, कामकरी वर्गाची बाजू हिरीरीने मांडली.

बा.द.सातोस्कर म्हणतात...

(प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार, दै. गोमन्तकचे पहिले संपादक बा.द.सातोस्कर यांच्या ‘गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार’ पुस्तकातील ‘नारायण देसाई’ या लेखातील निवडक भाग.)

ज्या ज्या वेळी नारायण देसाई या गोमंतकीय साम्यवादी लेखकांचे लिखाण माझ्या वाचनात येते त्या त्या  वेळी भाई डांगे यांची मला आठवण होते. तोच चौफेर अभ्यास, तोच युक्तीवाद, ताीच धारदार लेखणी आणि तोच इतिहास-पुराणाकडे पाहाण्याचा साम्यवादी दृष्टिकोन. डांग्याना ललित साहित्याची आवड आहे आणि म्हणूनच त्यांचे पार्लमेंटरी भाषण आणि लेखनही एकाद्या ललित कृतीचे रूप घेते. देसाईचेही असेच आहे. त्यांची बहुतेक पुस्तके गंभीर प्रकृतीची असली तरी ती शैलीदार असतात, त्याना साहित्यिक टच असतो आणि त्यामुळे ती वाचताना वाचकांना कंटाळा येत नाही. साम्यवादी लेखकात क्वचितच दिसणारे हे गुण डांगे आणि देसाई या दोघांच्याही ठिकाणी केंद्रित झाले आहेत.

1960 पर्यंत नारायण देसाई यांचा माझा साधारणसा परिचय होता. मुंबईत काम करणारे जॉर्ज वाझ, श्रीकांत लाड (पु.मं.लाडांचे सावत्र बंधु), चंद्रकांत काकोडकर (लेखक काकोडकर नव्हेत)  यांच्यासारखेच नारायण देसाई हेही एक गोमंतकीय साम्यवादी आहेत व त्यांच्याप्रमाणेच क्रियाशील कार्यकर्ते आहेत एवढीच त्यांच्याबद्दल माहिती होती. परंतु ते साहित्यिक आहेत आणि त्यांच्यामागे साम्यवादाने भारलेल्या गोमंतकीय तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी आहे याची मला कल्पनाही नव्हती.

पण ही कल्पना पहिल्या प्रथम मला आली ती 1960 साली गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी अटीतटीची निवडणूक झाली त्यावेळी. कार्यकारी मंडळाच्या हव्या असलेल्या उमेदवाराविरुद्ध काही साम्यवादी सभासदानी नारायण देसाईंचे नाव सुचविले आणि त्यांना जिद्दीने निवडून आणले तेव्हा. गोमंतकीय थोर साहित्यिकाना द्यावयाचा हा मान साहित्यक्षेत्रात नावही न ऐकलेल्या एका असाहित्यिक गृहस्थाला मिळाला म्हणून आम्ही खट्टू झालो. त्या वेळेपर्यंत एक दोन नाटके तेवढी देसाईंनी लिहिली होती. पण ती देसाई गुरूजी या नावाने आणि देसाई गुरूजी म्हणजेच नारायण देसाई याची आम्हाला सूतराम कल्पना नव्हती.

हे साम्यवादी पुढारी संमेलनाच्या व्यासपीठावरून काय बोलणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नव्हती हेही पूर्णपणे खरे नव्हे. साम्यवादावर अनाकलनीय भाषेत एखादे व्याख्यान देतील अशी अंधुक कल्पना होती. आणि ती खरी ठरली तरी खोटीही ठरली. साम्यवादावरच त्यानी आपल्या भाषणात भर दिला. पण ते भाषण इतके प्रभावी, साधार, स्पष्ट, मुद्देसुद आणि सामान्यानाही समजेल अशा सोप्या पण साहित्यमूल्य असलेल्या भाषेत केले आणि त्याचा संदर्भ गोव्यातील सोशियो-इकॉनॉमिक प्रश्‍नांची जोडला की संमेलनाच्या व्यासपीठावरून असे परखड विचार पहिल्याप्रथम मांडणारा हा साम्यवादी कार्यकर्ता एक विद्वान तर आहेच, पण साहित्यिकही आहे याची मला खूणगांठ पटली. त्यांच्या भाषणातील एकदोन वाक्ये मी इथे उद्धृत करतो. भाषणाच्या ओघात ते म्हणाले, “साहित्यांतल्या सौंदर्यलुब्धाना, नादलुब्धाना आणि वादलुब्धाना मी एवढेच सांगू इच्छितो की जीवनातले आणि साहित्यातले खरे सौंदर्यमूल्य मानवी पुरुषार्थाच्या उदरातच दडलेले असते’’ त्यानी साहित्यिकाना आवाहन केले, “ साहित्यिक बंधूनो, संस्कृतीच्या भुकेने आणि तहानेने वळवळणार्‍या जनतारूपी मोराचा विद्ध पिसारा चुचकारण्या-पिचकारण्याऐवजी त्या परास्त मोराला आर्थिक निर्भयतेचा चारा घालणारे विचार मांडू या’’ देसाई यांच्या विचारसरणीबद्दल आणि शब्दसरणीबद्दल ही दोनच वाक्ये कितीतरी सांगून जातात. त्यांचा व त्यांच्या कार्याचा पुढे अधिक परिचय झाला तेव्हा देसाईच्या या शब्दांमागे ध्येयनिष्ठा, साम्यवादावरील अढळ विश्‍वास, दलितांबद्दलची कणव आणि स्वत:च्या जबाबदारीची जाणीव होती याची मला पुरी कल्पना आली त्याचबरोबर आणखी एक गोष्ट कळली की त्यांचे विचार इतर अनेक साम्यवाद्यांप्रमाणे पोथीनिष्ठ नसून जीवननिष्ठ आहेत.
........

असा हा विचारवंत व इतरांना विचारशील बनविण्यासाठी झटणारा साम्यवादी नेता माझा स्नेही आहे याचा मला अभिमान वाटतो. साम्यवादावरील पुस्तके मी वाचली होती, साम्यवादी जागतिक राजकारणाचा थोडा अभ्यास केला होता, परंतु नारायण देसाई यांच्या ग्रंथांनी मला एक नवीन दृष्टी दिली.

प्रज्ञावंतांच्या मालिकेतील प्रकाशदीप : नारायण देसाई


नारायण देसाई मूळ पेडण्याचे, 1920 साली त्यांचा जन्म झाला. गोव्यात त्यांच्या काळात जे शिक्षण मिळण्याची सोय होती त्याचा त्यांनी लाभ घेतला. 1943 साली त्यांनी साहित्य व तत्वज्ञान हे विषय घेऊन पोर्तुगीज लायसियमचा कोर्स पूर्ण केला. हे शिक्षण म्हणजे आज ज्याला आपण उच्च माध्यमिक म्हणतो त्याच्यापेक्षा जरा वरच्या स्तराचे. यापेक्षा उच्च शिक्षण गोव्यात मिळण्याची त्याकाळी सोय नव्हती. पण जे काही शिक्षण मिळणे शक्य होते त्याचा लाभ घेऊन त्या शिदोरीच्या बळावर ते मुंबईला गेले. तेथे त्यांचा पुरोगामी विचारप्रणालीच्या म्हणजे मार्क्सवादी विचारसरणीच्या मंडळींशी संबंध आला आणि तेथेच त्यांचा क्रांतीपथावरील प्रवास सुरू झाला. या प्रवासासाठी आवश्यक असलेली मनोभूमी, काहीशा प्रमाणात ते विद्यार्थी दशेतच असतानाच अप्रत्यक्षपणे तयार झाली होती असे ते सांगत. पेडण्यातील जमीनदारी व तिचे प्रताप डोळसपणे त्यांनी पाहिले होते. शिवाय, स्वभावत:च त्यांच्यात जो एक चिकित्सक वसत होता त्यामुळे ‘हे असेच का?’ यापेक्षा वेगळे का असूं नये ?’ अशा प्रकारचे प्रश्‍न ते स्वत:लाच विचारीत असत. कुणीतरी, काहीतरी सांगतो आहे, ते ऐका व त्याप्रमाणे वागा या वृत्तीला त्यांच्यात थारा नव्हता. यामुळे त्यांच्या दृष्टीला व विचारांनाही बुद्धिप्रामाण्यवादाचे अधिष्ठान प्राप्त होत गेले होते. अंधश्रद्धा व परंपरावाद यापासून ते आपोआपच दूर गेले होते व त्यांच्या बुद्धाला (एसआयसी) तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठेचा धारदारपणा आला होता. मुंबईत गेल्यावर याला मार्क्सवादी विचारधारेची जोड मिळाली आणि त्यांची पुढची वाटचार सुरू झाली.

मुंतबईत, मार्क्स-लेनिन हे त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय बनले होतेच. यांतूनच त्यांना आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीतील प्रकाशाचा मार्ग सापडला. ते कम्युनिस्ट पक्षाचे  सदस्य झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉ. श्रीपाद डांगे आणि त्या पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी नारायण देसाई यांच्या विचारपद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले व त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या विचारांना पक्षाच्या वरच्या वर्तुळात मानाचे स्थान प्राप्त झाले.  यातूनच कॉ. डांगे व नारायण देसाई यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली. मार्क्सवाद व संबंधित विषयावर कॉ. डांगे व देसाई यांच्यात प्रदीर्घ चर्चा चालत असत. नारायण देसाई हे कॉ. डांगे यांच्या निकटवर्तीयापैकी एक होते. चिनी आक्रमणानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात अनेक वादळे उठली व उलथापालथीही झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची छकले झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकीकडे तर दुसरीकडे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)निर्माण झाला. परंतु कॉ. डांगे व नारायण देेसाई यांच्यात मात्र शेवटपर्यंत कधीच अंतर निर्माण झाले नाही.

कम्युनिस्टेतरांची, कम्युनिस्टांकडे विशेषत: कम्युनिस्ट पक्षाच्या मंडळीकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी असते. कम्युनिस्ट विचारवंत म्हटला रे म्हटला की तो कम्युनिस्टेतरांना पोथीनिष्ठ-डॉग्मॅटीक वाटतो. कम्युनिस्ट पक्षाने आखून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन तो विचार करणारच नाही असा तर एक समजच होता. वैचारिक मोकळेपणा त्याला अभिप्रेतच नसतो अशीही सर्वसामान्याची एक धारणा असते. नारायण देसाईंना मी अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यातील विचारवंत, ते कम्युनिस्ट असूनही कधीच मला बंदिस्त चौकटीतील विचारवंत वाटला नाही. पुष्कळदा या विषयावर चर्चा करण्याचीही संधी मला लाभली होती. काही वर्षांपूर्वी पुण्यात राहात होते तेव्हा सबंध रात्रभर या विषयावर आम्ही बोललो होतो. मी एक एक प्रश्‍न विचारीत होतो व देसाई त्याची उत्तरे देत होते-अगदी विस्तारपूर्वक. देसाई बोलू लागले म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणणे अनुचित वाटे. माझ्या अनेक प्रश्‍नांना व शंकाना त्यांनी दिलखुलासपणे प्रत्युत्तरे दिली. ते भरभरून बोलत होते. ते मार्क्स व संबंधित तत्त्वज्ञानाचे गाढे चिंतक व अभ्यासक होते. याउलट माझी भूमिका बर्‍याच प्रमाणात एखाद्या श्रोत्याची असावी तशी होती. नारायण देसाई म्हणत होते - कम्युनिस्टांवर पोथीनिष्ठपणाचा आरोप होतो ही गोष्ट काहीशा प्रमाणात खरी आहे. पण या बाबतीत वस्तुस्थिती समजून घेण्यापेक्षा अपसमजावरच अधिक भर देण्यात येतो हे विसरू नका. शिवाय, कम्युनिस्टेतर जे आमच्यावर पोथीनिष्ठपणाचा आरोप करतात, त्यांच्याही आपापल्या पोथ्या आहेतच की. देसाईंनी मला सांगितले होते की आम्ही कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक शेवटी भारताचा भारतासाठीच विचार करतो असे मला म्हणायचे आहे. मार्क्सवादाचा आधार घेऊन लेनीननी रशियातील तत्कालीन परिस्थितीचा विचार केला व त्यानुसार कृतीचा मार्ग अनुसरला. रशियन क्रांतिचा खरा प्रणेत तेथील कामगार वर्ग होता. बहुसंख्य शेतकरी वर्ग मागाहून आला. याउलट चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीत शेतकरी वर्गच आघाडीवर होता. माओ त्से तुंगनी या शेतकरी वर्गालाच बरोबर घेऊन क्रांतीची आखणी केली व तो त्यांत यशस्वी झाला. भारतातील कम्युनिस्ट चळवळीची परिमाणे, आम्ही आंतरराष्ट्रवाद वगैरे म्हटले तरी येथील परिस्थिती लक्षात घेऊन ठरविली पाहिजेत. आणि माझ्या मते भारतातील कम्युनिस्ट चळवळीची तीच खरी दिशा होय.

नारायण देसाईंशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली होती व ती म्हणजे सर्वसाधारणपणे जो समज होता त्या पोथीनिष्ठपणापेक्षा ते वेगळ्या प्रकारे विचार करणारे व मूळ तत्वांना बगल न देता वेगळ्या प्रकारे वैचारिक मांडणी करणारे होते. ते मार्क्सवादाचा धागा पकडून, भारतीय समाजजीवनात परिवर्तनशील असे जे काही आहे त्याचा सतत शोध घेत होते. ज्या गोष्टी कालबाह्य ठरलेल्या आहेत त्यांना बगल देऊन परिवर्तनशीलतेबरोबरच क्रांतीकारी बदलांकडे नेणार्‍या मूल्यांची त्यांची चिकित्सकदृष्टी शोध घेण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांच्या या प्रयत्नांचा माझ्यासारख्याच सर्वांना लगेच प्रत्ययही आलाच.

नारायण देसाईंनी आपल्या पद्धतीने विचार प्रवर्तनाचा जो मार्ग आखला होता त्यांत त्यांनी सर्वप्रथम आपला मोर्चा स्वामी विवेकानंदांकडे वळविला. विसाव्या नव्हे एकविसाव्या शतकांत स्वामी विवेकानंदांचे विचार  व कार्य याची उपयुक्तता काय असू शकेल याचा त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून प्रथम वेध घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे स्वामी विवेकानंदांची वेदांतनिष्ठ भूमिका आणि त्याचा धागा पकडून लोकसमाजाचे पुनरुत्थान आणि दुसर्‍या बाजूला विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद यांची चिकित्सा करून त्या सर्वांची मार्क्सवादी विचारधारेच्या प्रकाशात तपासणी करण्याचा प्रयत्न नारायण देसाईंनी करून पाहिला. परंतु, मला असे वाटते, या प्रयत्नांत त्यांना फारसे समाधान लाभले नाही.त्यानंतर ते गौतम बुद्धाकडे वळले व माझ्या मते, त्यांना त्या बौद्ध विचारधारेत अनेक कठीण समस्यांची सोपी उत्तरे मिळत गेली.बुद्धाच्या निर्वाणानंतर लोकांनी त्याला ‘देव’ बनवून त्याची पूजा सुरू केली व त्याची मंदिरेही उभी केली असतील. परंतु, बुद्ध हा खर्‍या अर्थाने केवळ या भारत वर्षांतलाच नव्हे तर संपूर्ण जगातला, वैचारिक बजबजपुरीतून माणसाला वर उचलून घेणारा पहिला वहिला बुद्धीप्रामाण्यवादी - रॅशनॅलिस्ट होता. बुद्धाला आम्ही भगवान बुद्ध म्हणत असलो तरी त्यांनी चमत्कार, दृष्टांत असल्या प्रकारांना कधीच थारा दिला नव्हता. आत्मा, पुनर्जन्म असल्या गोष्टीचेही त्याने स्तोम माजविले नाही. वेदाचे सर्वश्रेष्ठत्व तर बुद्धाने मुळातच नाकारले. वर्णाश्रम पद्धतीला तर अगदीच फाटा दिला. बुद्धाने व्यक्तिगत तसेच सामुदायिक जीवनांतील नीतीमूल्यांवर भर दिला. मी देवाचा पुत्र, प्रेषित किंवा अवतार असल्या भाकडकथा तर बुद्धाने कधीच सांगितल्या नाहीत. देवत्वाचे स्तोम तर कधीच माजविले नाही. नारायण देसाईना हा बुद्ध मनापासून आवडला. त्यांच्यातील मार्क्सवादी विचारधारेला हा बुद्ध अधिक जवळचा वाटला आणि एका हातात मार्क्स व दुसर्‍या हातात बुद्ध म्हणावा अशा प्रकारे ते अगदी सखोलपणे बुद्धाचा मागोवा घेत गेले. केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञानच नव्हे तर राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्‍नाचा व मूल्यांचाही ते बौद्ध विचारसरणीच्या प्रकाशांत विचार करू लागले. यातूनही त्यांचे अप्रतिम असे ‘बुद्ध आपुला सांगाती’ हे पुस्तक निर्माण झाले. त्यापूर्वी त्याचे प्रखर बुद्धीप्रामाण्यवर भर देणारे ‘ईश्‍वर नव्हे मीच खरा’ हे विचारपरिप्लुत असे पुस्तक आले होते. ही दोन्ही पुस्तके देसाईंना आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेवटी शेवटी लिहिली. म्हणजे सत्तरी उलटल्यावर एखाद्या नव्या दमाच्या तरुणालाही लाज वाटावी अशा उमेदीने ते नव्या प्रकारच्या विचारांची मांडणी करू लागले होते. नारायण देसाई हे कम्युनिस्ट चळवळींतून पुढे आलेले असल्यामुळे ते इतर कम्युनिस्टांसारखेच ‘कॉमे्रड’ होते. परंतु हा कॉमे्रड पोथीनिष्ठ-डॉग्मॅटिक नव्हता. ते प्रखर असे बुद्धीनिष्ठ होते. तर्कनिष्ठ होते, हे त्यांनी आपल्या विचारांना जी नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यावरून नि:संदेह सिद्ध होते.

नारायण देसाईंनी विपुल लेखन केले. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. या पुस्तकांमध्ये लेनिनचे चरित्र आहे. लेनिनचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना आकलन करून देणारी ग्रंथरचना त्यांनी केली.‘शास्त्रीय तत्त्वज्ञान’सारखा विचारवंतांनी गौरविलेला ग्रंथ लिहिला. दत्ता बाळ नावाचे बुवा-बाबांच्या परंपरेतले एक तथाकथित उपदेशक होऊन गेले. तरुण वयातच त्यांचे निधन झाले. अध्यात्मिकतेच्या नावाखाली हा माणूस नुसता वैचारिक गोंधळ माजवीत सुटला होता. या गोंधळलेल्या विचारसरणीची चिरफाड करण्याच्या निमित्ताने नारायण देसाईंनी ‘समाजक्रांतीच्या प्रकाश रेषा’ हा ग्रंथ लिहिला. विद्वजनांनी या ग्रंथाचेही फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.

नारायण देसाईंनी मराठीबरोबरच कोंकणीतूनही लिहिले. कोंकणीतून त्यांनी लिहिलेले लेनिनचे चरित्र हा एक महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. गोवामुक्तीपूर्वी, मुंबईत ‘साळीक’(कमळ) नावाचे एक मासिक प्रकाशित होत असे. शंकर भंडारी, कृष्णा करवार, लक्ष्मीदास बोरकर यांच्यासह नारायण देसाईही त्या मासिकाचे एक संपादक होते. देसाईनी गोवा मुक्तीसंग्रामातही भाग घेतला होता. त्यासाठी तुरुंगवासही भोगला होता. गोवा मुक्तीनंतर गोव्यात कम्युनिस्ट चळवळीबरोबरच अन्य सहकार्‍यांसमवेत शेतकरी-कामगार संघटना उभारणीचेही कार्य त्यांनी केले. देसाई हे केवळ चिंतक-विचारकच नव्हते. सर्वसामान्याच्या हातात हात घालून, अन्यायाविरुद्ध लढणारे ते एक आदर्श कर्मयोगीही होते. गोव्यात आज कामगार चळवळ शिल्लक असेल तर तिच्या मुळाशी नारायण देसाईंसारख्याचे श्रम आहेत हे विसरता येणार नाही. असे हे देसाई 1970 नंतरच्या काळांत गोव्यातून पुन्हा मुंबईला गेले. काही काळ तेथे राहिल्यानंतर त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. परंतु पुणे त्यांना मानवेना. ते परत मुंबईत येऊन स्थायिक झाले.  मुंबईत ते ‘थिंकर्स अकादमी’ पासून अनेक समाजोपयोगी उपक्रमांत व्यस्त राहिले. अलिकडेच ते मुंबई सोडून परत पुण्याला रहायला आले होते. शरीर साथ देत होते तोपर्यंत ते अधूनमधून गोव्याला येत असत. ते आले म्हणजे त्यांच्याबरोबर काम केलेले जुने कार्यकर्ते, मित्रमंडळी व त्यांचे चाहते यांची लगेच बैठक जमे. प्रत्येक वेळी त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही ना काही असेच. नारायण देसाईंनी आपल्या हयातीत अनेक जाहीर सभांतून भाषणे केली. अनेक विषयांवर व्याख्याने दिली. परंतु खरे नारायण देसाई खुलायचे ते बैठकसदृश्य सभांतून उपस्थिताशी स्नेहसंवाद साधताना. अशावेळी त्यांच्या वाणीला एक वेगळाच रंग चढे. विचाराची धार अधिक प्रखर होई. एकांतून दुसरा, दुसर्‍यांतून तिसरा अशी अपूर्व विचारमालिकाच सुरू होत असे. नारायण देसाई हे खरे म्हणजे या गोमान्तभूमीत जन्मलेले एक महान व्यक्तिमत्व. परंतु त्या व्यक्तिमत्वाची गोमंतकीयांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती तेवढी ती घेतली नाही. कारण स्वत:च्याच विश्‍वात दंग असलेेेले गोमंतकीय त्यांना कधी ओळखूच शकले नाहीत.

-नागेश करमली
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व साहित्यिक

(‘लोकभूमी’च्या कॉ. नारायण देसाई स्मृती विशेषांकातून साभार)Narayan Atmaram Desai : Patriot and progressive writer


(selected portion from the article of F. Dias. The article is published in LOKBHUMI periodical's com. Narayan Dessai issue dated 15 September 2007)

Goan Freedom struggle produced men and women of great caliber and intellenct. They used their pen and energy for the liberation of men from exploitation, political and cultural.

The fascist regime in Portugal sent them to jail. Some went in exile. Some took shelter in India, British, Africa and Europe. Young Narayan Atmaram Desai was one of them who went to Mumbai and worked not only with Goan patriots but Indian freedom fighters.

After completing his early education in Marathi and Portuguese, he joined the higher education of the ‘Curso de Letras’ in Portuguese in Mapusa and acquired a degree of ‘Acharya’ of Bhartiya Vidya Peeth and turned to teaching and writing. 
…….

Mr. Narayan Desai was active in the progressive students  movement in Mumbai and Pednem, Goa and wrote two plays ‘Kangal Bharat’ in 1945 and ‘Krantivir’ in 1946. Both the plays were banned and copies were confiscated in Mumbai.
…....

In Mumbai, Mr. Desai set up Borivali Commune in 1948 and the police called it ‘Desai Guruji’s Borivali Den’. Many youngmen and workers, attracted by Marxist ideology, gathered around Desai Guruji and Borivali in the far away western suburb became a major centre of progressive activities.(sic). Desai Guruji edited newspapers like ‘salik’ and ‘Yugdeep’. He was detained by the Goa Police in Mapusa and later imprisoned in Aguada, Reis Magos and Panaji Jails. After his release he went to Mumbai in exile. The Goan movement with the Goan People’s Party and the CPI. (sic) He also contined his literary work. He was elected chairman of the Reception Committee of Gomantak Marathi Sahitya Sammelan at Lonavla in 1960 on the eve of Goa’s Liberation.

He was founder editor of weeklies like ‘Loksangram’, ‘Amche Shram’, ‘Amche Razhya’ and bi-monthly ‘Lokbharat’. It was at this structure, this writer met Mr. Desai.

As a member of the World Peace Council, he raised the issue of Goa’s Liberation at all its sessions. He was member of the freedom fighters delegation which met the member of the union cabinet under the leadership of Aruna Asaf Ali to discuss Goa’s Liberation before the Government took the decision of the armend action in Goa.

When the Indian army marched to liberate Goa, Mr. Desai organized Citizen’s Committee to welcome the soldiers and to show them the way to Panaji.

After liberation he joined Mr. Divakar Kakodkar, CPI leader, in organizing Goa Kisan Sangh in Tuem, Pednem in 1961 and its president till 1971.

He was founder member of the Goa State CPI formed in Belgaum and was elected on the CPI National council in 1964.

He visited USSR several times and was elected leader of the All Indian CPI Journalist delegation which went to German Democratic Republic in 1972, was awarded Gold medal in Philosophy for his ‘Shastriya Tatwadnyan’ by the Marathi Sahitya Sammelan in 1965. He also got a first award of the Kala Academy, Government of Goa, Daman and Diu for the Biography of Lenin in 1973. He also got the Soviet Land Jawaharlal Neharu Award in 1972 … His books have been translated into English and Gujrati. 

Narayan Desai was connected with the Goan People’s Party, Bombay Youth League, apart from the CPI. Born on December 16, 1920 in Poroscodem, Pednem, he died recently in Pune. His friends paid him tributes in Panaji and Pednem.F.Dais

Journalist and Freedom Fighter.

कॉ. नारायण देसाई यांची नियतकालिके

कॉ. नारायण देसाई यांनी साम्यवादी विचारांना वाहिलेली काही पत्रे गोव्यात सुरु केली. त्यात ‘लोकसंग्राम’ हे साप्ताहिक होते. ते 26 सप्टेंबर 1965 रोजी सुरु झाले. मडगाव येथून निघणारे हे साप्ताहिक तसे अल्पजीवीच ठरले. मग त्यांनी 1970 साली ‘लोकभारत’ हे पाक्षिक पणजी येथून सुरू केले. ते 1977 पर्यंत चालू होते. त्याचे कार्यकारी संपादक म्हणून रमेश कोलवाळकर हे काम पहात. ‘लोकभारत’ आठ पृष्ठांचे असे. त्याचा दिवाळी अंक मात्र भरघोस आणि दर्जेदार निघे. हे नियतकालिक पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यात मार्क्सवादी विचारवंतांचे लेख येत. दिवाळी अंकात कथा, कविता असे ललित साहित्य असे.
या लोकभारतचे पुढे 1982 साली नामांतर होऊन ‘लोकभूमी’ निघू लागले तेही पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यावर कार्यकारी संपादक म्हणून रमेश कोलवाळकर यांचे नाव असते.

(रवींद्र घवी, गोमंतकीय मराठी वाङमयाचा इतिहास (2))

आणखी थोडी साहित्यविषयक व चरित्रविषयक माहिती


1. नारायण देसाई हे साम्यवादी बनले असले तरी ते एका खानदानी देसाई घराण्यात जन्मले होते.

2. लेत्रश (आर्टस्) कोर्स घेतल्यामुळे पोर्तुगीजप्रमाणेच फ्रेंच, इंग्रजी व लॅटीन भाषांचा त्यांचा चांगलाच अभ्यास झाला.

3. सन 1943 पर्यंत शिक्षण घेतल्यावर मुंबईच्या सेंट अ‍ॅन्ड्रूज हायस्कूलमध्ये नोकरी धरली. तिथे ते लॅटीन भाषा शिकवीत.

4. पोर्तुगीज भाषेत त्यानी आपला पहिला लेख लिहिला. 1939 साली प्रा. मेसियश गॉमिस यांच्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या ‘ऊ एराल्द’ दैनिकात त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. गणपती स्वर्गात राहाणारा देव नसून खरा योद्धा होता, वेदकालीन एका गणांचा नायक होता आणि तिबेटवर स्वारी करून तो प्रदेश त्याने मुक्त केला; असे विचार पं. सातवळेकरांनी मांडले होते. त्यांचा अनुवाद करून देसाईनी तो लेख लिहिला होता.

5. मुंबईला गेल्यावर त्यांनी ‘कंगाल भारत’ नाटक लिहिले. आंतरजातीय प्रेमसंबंधांवर आधारित हेेे नाटक होते. नंतर त्यांनी सुभाषबाबूंच्या जीवनावर ‘क्रांतिवीर’ नाटक लिहिले. दोन्ही नाटके 1947 साली प्रसिद्ध झाली.

6. सन 1955 साली कॉ. देसाईंची काँ. डांगेंशी ओळख झाली. ते पक्षाच्या ‘युगांतर’ साप्ताहिकात लिहू लागले.

7. काही सहकार्‍यांच्या मदतीने ‘साळीक’(कोकणी) अमर शेख यांच्या सहकार्याने ‘युगदीप’ ही कालिके त्यानी काही काळ चालवली, सावंतवाडीला ‘आमचे श्रम आमचे राज्य’, बेळगावला ‘लोकसंग्राम’, पणजीहून ‘लोकभारत’ कालिक काढले.

8. सन 1962 ते 1975 या काळात त्यांनी सहा पुस्तके लिहिली. त्यात ‘लेनीन : जीण आनी कतृत्व’ हे कोंकणी चरित्र होते. त्याशिवाय,  शास्त्रीय तत्त्वज्ञान (1962), मार्क्सवाद-लेनीनवादाची मूलतत्त्वे (1964) आणि समाजक्रांतिच्या प्रकाशरेखा (1972) ही पुस्तके महत्त्वाची होती.

9. ‘मार्क्सवाद-लेनीनवादाची मूलतत्त्वे’ या पुस्तकाला गोमंतक साहित्य संमेलनाच्या सन 1965च्या म्हापसा अधिवेशनात सुवर्णपदक मिळाले होते.

10. ‘लेनीन : जीण आनी कतृत्व’ या पुस्तकास कला अकादमीचा पुरस्कार लाभला.

11. भुमिगत असतानाच्या काळात देसाईंनी ‘मार्क्सवादच का ?’ हा ग्रंथ सूदनचंद्र या टोपण नावाने लिहिला होता.

12. ‘लेनिन आणि आपण’ हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहिले. ‘या ग्रंथाने भारतीय साम्यवादी वैचारिक ग्रंथात एक मोलाची भर घातली आहे.’ असे बा.द.सातोस्कर म्हणतात.

13. त्यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत ‘मार्क्सवाद व अस्तित्ववाद’ या विषयावर भाषण झाले तेव्हा अध्यक्ष वसंतराव तुळपुळे यांनी देसाई हे कोसंबी पितापुत्रांच्या व्यासंगी परंपरेतील गोमंतकीय वक्ते आहेत असे म्हटले होते.

14. गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी 23 डिसेंबर 1961 या दिवशी दिवाकर काकोडकर, नारायण देसाई प्रभृति मंडळीनी पेडणे तालुक्यातील तुयें गावी गोवा किसान संघ स्थापन केला. मुक्त गोव्यातली ही पहिली संघटना.

15. सन 1964 साली कम्युनिस्ट पार्टीच्या नॅशनल कौन्सिलवर नारायण देसाईंची नियुक्ती झाली.

16. ‘लेनिनचा मटीरियलिझम व एंपीरियोक्रिटीसिझम’ असा एक तत्त्वज्ञानपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथातील काही विचारांची चर्चा मराठीत प्रथम देसाई यांनी केली आहे असा अभिप्राय पां. वा. गाडगीळ यानी दिला आहे.

17. नारायण देसाई यांचे साहित्य, कार्य व नेतृत्व विचारात घेऊन त्यांना ‘सोविएत लॅण्ड’चे नेहरू पारितोषिक दोन वेळा प्रदान करण्यात आले व ते स्वीकारण्यासाठी दोन्ही वेळा ते मॉस्कोला गेले.

18. पूर्व जर्मनीला भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पत्रकार मंडळीचे प्रतिनिधी मंडळ गेले होते त्यांतही त्यांचा समावेश झाला होता.

(संदर्भ : गोमंतकीय साहित्याचे आधुनिक शिल्पकार)