“फ्रॉइड काय, मार्क्स काय, नेहरू काय किंवा इतर विचारवंत काय, सर्वाचेच विचार कालग्रासितच असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतु अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’’ - कॉ. नारायण देसाई




धगधगणर्‍या विचारांचा शांतशीतल ‘युगदीप’

(कॉ. नारायण देसाई यांच्या निधनानंतर पणजी-गोवा येथून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवप्रभा’ मध्ये तत्कालीन संपादक श्री. सुरेश वाळवे यांनी वरील शीर्षकाचा अग्रलेख दि. 7-8-2007 रोजी लिहिला होता. यात काही माहिती तसेच देसाईंच्या स्वभावाविषयीची टिप्पणी महत्त्वाची वाटली.)

...देवाधर्मावर विश्‍वास नसला तरी ‘फळाची अपेक्षा न बाळगता तू तुझे कार्य करीत रहा’ या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर असलेली त्यांची श्रद्धा. कंपूशाही करणे, आपले घोडे पुढे दामटणे, पित्त्यांमार्फत वर्णी लावून घेणे असले त्यांच्या स्वभावात नव्हते. विचार जहाल; पण माणूस स्वभावाने अत्यंत मवाळ. व्यक्तिमत्त्व नजरेत भरणारे नव्हते; पण बुद्धिमत्तेची झाक चेहर्‍यावर विलसत असायची. बोलणे शांत अन् स्वभाव सौम्य. एकटा का ते साम्यवादाच्या प्रभावाखाली आले; मागे हटले नाहीत.
... अनेक नास्तिक ‘संध्याछाया भिवविती ह्रदया’ असे झाल्यानंतर आस्तिक बनतात. कॉ. देसाई यानी मात्र एकदा का ईश्‍वराला सोडचिठ्ठी दिली ती दिली.
....................................
....पोर्तुगीज, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, स्पॅनिश आदी भाषांचे ज्ञान होते. देसाई यांची देशविदेशात व्याख्याने झाली, वाखाणली गेली.
....................................
त्यांनी ‘कंगाल भारत’ व ‘क्रांतिवीर’ ही नाटके लिहिली. ती पोर्तुगीजांविरुद्ध उठावास उद्युक्त करणारी असल्याने गोर्‍या सरकारने बंदी घातली. ‘सारीक’ व ‘युगदीप’ अशी दोन नियतकालिके त्यांनी संपादित केलीच; ‘सोविएत देस’ हे कोकणी नियतकालिकही ते काढत. अन् तेे रोमीमध्ये असे,÷ अशी आठवण काल ज्येष्ठ पत्रकार फ्लावियन डायस यांनी सांगितली.
...................................
ते सुरवातीस शिक्षक होते. पण कम्युनिझमची दीक्षा घेतल्यानंतर साहित्यविचाराला पुरेसा वेळ मिळेना. त्या काळात लिहिलेली एक कादंबरी समाधान न झाल्यामुळे आपण जाळून टाकल्याचे ते सांगत.
..................................
‘मार्क्सवादच का?’ हा ग्रंथ त्यानी सूदनचंद्र या टोपणनावाने लिहिला होता.
.................................
त्यांच्या ‘मूलगामी मूर्तिमंत’चे वर्णन त्या काळात ‘प्रज्ञेला चालना देणारा ग्रंथ’ या शब्दात झाले होते.
................................
....1961 हे जवळजवळ संपूर्ण साल त्यांनी गोवा सैन्यबळाने मुक्त करण्याच्या मागणीसाठी वेचले होते.
................................
‘लोकसंग्राम’,‘आमचे श्रम’, ‘आमचे राज्य’, ‘लोकभारत’, ‘लोकभूमी’ आदी नियतकालिके काढून त्यानी शेतकरी, कामकरी वर्गाची बाजू हिरीरीने मांडली.