(प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार, दै. गोमन्तकचे पहिले संपादक बा.द.सातोस्कर यांच्या ‘गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार’ पुस्तकातील ‘नारायण देसाई’ या लेखातील निवडक भाग.)
ज्या ज्या वेळी नारायण देसाई या गोमंतकीय साम्यवादी लेखकांचे लिखाण माझ्या वाचनात येते त्या त्या वेळी भाई डांगे यांची मला आठवण होते. तोच चौफेर अभ्यास, तोच युक्तीवाद, ताीच धारदार लेखणी आणि तोच इतिहास-पुराणाकडे पाहाण्याचा साम्यवादी दृष्टिकोन. डांग्याना ललित साहित्याची आवड आहे आणि म्हणूनच त्यांचे पार्लमेंटरी भाषण आणि लेखनही एकाद्या ललित कृतीचे रूप घेते. देसाईचेही असेच आहे. त्यांची बहुतेक पुस्तके गंभीर प्रकृतीची असली तरी ती शैलीदार असतात, त्याना साहित्यिक टच असतो आणि त्यामुळे ती वाचताना वाचकांना कंटाळा येत नाही. साम्यवादी लेखकात क्वचितच दिसणारे हे गुण डांगे आणि देसाई या दोघांच्याही ठिकाणी केंद्रित झाले आहेत.
1960 पर्यंत नारायण देसाई यांचा माझा साधारणसा परिचय होता. मुंबईत काम करणारे जॉर्ज वाझ, श्रीकांत लाड (पु.मं.लाडांचे सावत्र बंधु), चंद्रकांत काकोडकर (लेखक काकोडकर नव्हेत) यांच्यासारखेच नारायण देसाई हेही एक गोमंतकीय साम्यवादी आहेत व त्यांच्याप्रमाणेच क्रियाशील कार्यकर्ते आहेत एवढीच त्यांच्याबद्दल माहिती होती. परंतु ते साहित्यिक आहेत आणि त्यांच्यामागे साम्यवादाने भारलेल्या गोमंतकीय तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी आहे याची मला कल्पनाही नव्हती.
पण ही कल्पना पहिल्या प्रथम मला आली ती 1960 साली गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी अटीतटीची निवडणूक झाली त्यावेळी. कार्यकारी मंडळाच्या हव्या असलेल्या उमेदवाराविरुद्ध काही साम्यवादी सभासदानी नारायण देसाईंचे नाव सुचविले आणि त्यांना जिद्दीने निवडून आणले तेव्हा. गोमंतकीय थोर साहित्यिकाना द्यावयाचा हा मान साहित्यक्षेत्रात नावही न ऐकलेल्या एका असाहित्यिक गृहस्थाला मिळाला म्हणून आम्ही खट्टू झालो. त्या वेळेपर्यंत एक दोन नाटके तेवढी देसाईंनी लिहिली होती. पण ती देसाई गुरूजी या नावाने आणि देसाई गुरूजी म्हणजेच नारायण देसाई याची आम्हाला सूतराम कल्पना नव्हती.
हे साम्यवादी पुढारी संमेलनाच्या व्यासपीठावरून काय बोलणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नव्हती हेही पूर्णपणे खरे नव्हे. साम्यवादावर अनाकलनीय भाषेत एखादे व्याख्यान देतील अशी अंधुक कल्पना होती. आणि ती खरी ठरली तरी खोटीही ठरली. साम्यवादावरच त्यानी आपल्या भाषणात भर दिला. पण ते भाषण इतके प्रभावी, साधार, स्पष्ट, मुद्देसुद आणि सामान्यानाही समजेल अशा सोप्या पण साहित्यमूल्य असलेल्या भाषेत केले आणि त्याचा संदर्भ गोव्यातील सोशियो-इकॉनॉमिक प्रश्नांची जोडला की संमेलनाच्या व्यासपीठावरून असे परखड विचार पहिल्याप्रथम मांडणारा हा साम्यवादी कार्यकर्ता एक विद्वान तर आहेच, पण साहित्यिकही आहे याची मला खूणगांठ पटली. त्यांच्या भाषणातील एकदोन वाक्ये मी इथे उद्धृत करतो. भाषणाच्या ओघात ते म्हणाले, “साहित्यांतल्या सौंदर्यलुब्धाना, नादलुब्धाना आणि वादलुब्धाना मी एवढेच सांगू इच्छितो की जीवनातले आणि साहित्यातले खरे सौंदर्यमूल्य मानवी पुरुषार्थाच्या उदरातच दडलेले असते’’ त्यानी साहित्यिकाना आवाहन केले, “ साहित्यिक बंधूनो, संस्कृतीच्या भुकेने आणि तहानेने वळवळणार्या जनतारूपी मोराचा विद्ध पिसारा चुचकारण्या-पिचकारण्याऐवजी त्या परास्त मोराला आर्थिक निर्भयतेचा चारा घालणारे विचार मांडू या’’ देसाई यांच्या विचारसरणीबद्दल आणि शब्दसरणीबद्दल ही दोनच वाक्ये कितीतरी सांगून जातात. त्यांचा व त्यांच्या कार्याचा पुढे अधिक परिचय झाला तेव्हा देसाईच्या या शब्दांमागे ध्येयनिष्ठा, साम्यवादावरील अढळ विश्वास, दलितांबद्दलची कणव आणि स्वत:च्या जबाबदारीची जाणीव होती याची मला पुरी कल्पना आली त्याचबरोबर आणखी एक गोष्ट कळली की त्यांचे विचार इतर अनेक साम्यवाद्यांप्रमाणे पोथीनिष्ठ नसून जीवननिष्ठ आहेत.
........
असा हा विचारवंत व इतरांना विचारशील बनविण्यासाठी झटणारा साम्यवादी नेता माझा स्नेही आहे याचा मला अभिमान वाटतो. साम्यवादावरील पुस्तके मी वाचली होती, साम्यवादी जागतिक राजकारणाचा थोडा अभ्यास केला होता, परंतु नारायण देसाई यांच्या ग्रंथांनी मला एक नवीन दृष्टी दिली.