नारायण देसाई मूळ पेडण्याचे, 1920 साली त्यांचा जन्म झाला. गोव्यात त्यांच्या काळात जे शिक्षण मिळण्याची सोय होती त्याचा त्यांनी लाभ घेतला. 1943 साली त्यांनी साहित्य व तत्वज्ञान हे विषय घेऊन पोर्तुगीज लायसियमचा कोर्स पूर्ण केला. हे शिक्षण म्हणजे आज ज्याला आपण उच्च माध्यमिक म्हणतो त्याच्यापेक्षा जरा वरच्या स्तराचे. यापेक्षा उच्च शिक्षण गोव्यात मिळण्याची त्याकाळी सोय नव्हती. पण जे काही शिक्षण मिळणे शक्य होते त्याचा लाभ घेऊन त्या शिदोरीच्या बळावर ते मुंबईला गेले. तेथे त्यांचा पुरोगामी विचारप्रणालीच्या म्हणजे मार्क्सवादी विचारसरणीच्या मंडळींशी संबंध आला आणि तेथेच त्यांचा क्रांतीपथावरील प्रवास सुरू झाला. या प्रवासासाठी आवश्यक असलेली मनोभूमी, काहीशा प्रमाणात ते विद्यार्थी दशेतच असतानाच अप्रत्यक्षपणे तयार झाली होती असे ते सांगत. पेडण्यातील जमीनदारी व तिचे प्रताप डोळसपणे त्यांनी पाहिले होते. शिवाय, स्वभावत:च त्यांच्यात जो एक चिकित्सक वसत होता त्यामुळे ‘हे असेच का?’ यापेक्षा वेगळे का असूं नये ?’ अशा प्रकारचे प्रश्न ते स्वत:लाच विचारीत असत. कुणीतरी, काहीतरी सांगतो आहे, ते ऐका व त्याप्रमाणे वागा या वृत्तीला त्यांच्यात थारा नव्हता. यामुळे त्यांच्या दृष्टीला व विचारांनाही बुद्धिप्रामाण्यवादाचे अधिष्ठान प्राप्त होत गेले होते. अंधश्रद्धा व परंपरावाद यापासून ते आपोआपच दूर गेले होते व त्यांच्या बुद्धाला (एसआयसी) तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठेचा धारदारपणा आला होता. मुंबईत गेल्यावर याला मार्क्सवादी विचारधारेची जोड मिळाली आणि त्यांची पुढची वाटचार सुरू झाली.
मुंतबईत, मार्क्स-लेनिन हे त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय बनले होतेच. यांतूनच त्यांना आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीतील प्रकाशाचा मार्ग सापडला. ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉ. श्रीपाद डांगे आणि त्या पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी नारायण देसाई यांच्या विचारपद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले व त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या विचारांना पक्षाच्या वरच्या वर्तुळात मानाचे स्थान प्राप्त झाले. यातूनच कॉ. डांगे व नारायण देसाई यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली. मार्क्सवाद व संबंधित विषयावर कॉ. डांगे व देसाई यांच्यात प्रदीर्घ चर्चा चालत असत. नारायण देसाई हे कॉ. डांगे यांच्या निकटवर्तीयापैकी एक होते. चिनी आक्रमणानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात अनेक वादळे उठली व उलथापालथीही झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची छकले झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकीकडे तर दुसरीकडे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)निर्माण झाला. परंतु कॉ. डांगे व नारायण देेसाई यांच्यात मात्र शेवटपर्यंत कधीच अंतर निर्माण झाले नाही.
कम्युनिस्टेतरांची, कम्युनिस्टांकडे विशेषत: कम्युनिस्ट पक्षाच्या मंडळीकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी असते. कम्युनिस्ट विचारवंत म्हटला रे म्हटला की तो कम्युनिस्टेतरांना पोथीनिष्ठ-डॉग्मॅटीक वाटतो. कम्युनिस्ट पक्षाने आखून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन तो विचार करणारच नाही असा तर एक समजच होता. वैचारिक मोकळेपणा त्याला अभिप्रेतच नसतो अशीही सर्वसामान्याची एक धारणा असते. नारायण देसाईंना मी अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यातील विचारवंत, ते कम्युनिस्ट असूनही कधीच मला बंदिस्त चौकटीतील विचारवंत वाटला नाही. पुष्कळदा या विषयावर चर्चा करण्याचीही संधी मला लाभली होती. काही वर्षांपूर्वी पुण्यात राहात होते तेव्हा सबंध रात्रभर या विषयावर आम्ही बोललो होतो. मी एक एक प्रश्न विचारीत होतो व देसाई त्याची उत्तरे देत होते-अगदी विस्तारपूर्वक. देसाई बोलू लागले म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणणे अनुचित वाटे. माझ्या अनेक प्रश्नांना व शंकाना त्यांनी दिलखुलासपणे प्रत्युत्तरे दिली. ते भरभरून बोलत होते. ते मार्क्स व संबंधित तत्त्वज्ञानाचे गाढे चिंतक व अभ्यासक होते. याउलट माझी भूमिका बर्याच प्रमाणात एखाद्या श्रोत्याची असावी तशी होती. नारायण देसाई म्हणत होते - कम्युनिस्टांवर पोथीनिष्ठपणाचा आरोप होतो ही गोष्ट काहीशा प्रमाणात खरी आहे. पण या बाबतीत वस्तुस्थिती समजून घेण्यापेक्षा अपसमजावरच अधिक भर देण्यात येतो हे विसरू नका. शिवाय, कम्युनिस्टेतर जे आमच्यावर पोथीनिष्ठपणाचा आरोप करतात, त्यांच्याही आपापल्या पोथ्या आहेतच की. देसाईंनी मला सांगितले होते की आम्ही कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक शेवटी भारताचा भारतासाठीच विचार करतो असे मला म्हणायचे आहे. मार्क्सवादाचा आधार घेऊन लेनीननी रशियातील तत्कालीन परिस्थितीचा विचार केला व त्यानुसार कृतीचा मार्ग अनुसरला. रशियन क्रांतिचा खरा प्रणेत तेथील कामगार वर्ग होता. बहुसंख्य शेतकरी वर्ग मागाहून आला. याउलट चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीत शेतकरी वर्गच आघाडीवर होता. माओ त्से तुंगनी या शेतकरी वर्गालाच बरोबर घेऊन क्रांतीची आखणी केली व तो त्यांत यशस्वी झाला. भारतातील कम्युनिस्ट चळवळीची परिमाणे, आम्ही आंतरराष्ट्रवाद वगैरे म्हटले तरी येथील परिस्थिती लक्षात घेऊन ठरविली पाहिजेत. आणि माझ्या मते भारतातील कम्युनिस्ट चळवळीची तीच खरी दिशा होय.
नारायण देसाईंशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली होती व ती म्हणजे सर्वसाधारणपणे जो समज होता त्या पोथीनिष्ठपणापेक्षा ते वेगळ्या प्रकारे विचार करणारे व मूळ तत्वांना बगल न देता वेगळ्या प्रकारे वैचारिक मांडणी करणारे होते. ते मार्क्सवादाचा धागा पकडून, भारतीय समाजजीवनात परिवर्तनशील असे जे काही आहे त्याचा सतत शोध घेत होते. ज्या गोष्टी कालबाह्य ठरलेल्या आहेत त्यांना बगल देऊन परिवर्तनशीलतेबरोबरच क्रांतीकारी बदलांकडे नेणार्या मूल्यांची त्यांची चिकित्सकदृष्टी शोध घेण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांच्या या प्रयत्नांचा माझ्यासारख्याच सर्वांना लगेच प्रत्ययही आलाच.
नारायण देसाईंनी आपल्या पद्धतीने विचार प्रवर्तनाचा जो मार्ग आखला होता त्यांत त्यांनी सर्वप्रथम आपला मोर्चा स्वामी विवेकानंदांकडे वळविला. विसाव्या नव्हे एकविसाव्या शतकांत स्वामी विवेकानंदांचे विचार व कार्य याची उपयुक्तता काय असू शकेल याचा त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून प्रथम वेध घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे स्वामी विवेकानंदांची वेदांतनिष्ठ भूमिका आणि त्याचा धागा पकडून लोकसमाजाचे पुनरुत्थान आणि दुसर्या बाजूला विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद यांची चिकित्सा करून त्या सर्वांची मार्क्सवादी विचारधारेच्या प्रकाशात तपासणी करण्याचा प्रयत्न नारायण देसाईंनी करून पाहिला. परंतु, मला असे वाटते, या प्रयत्नांत त्यांना फारसे समाधान लाभले नाही.त्यानंतर ते गौतम बुद्धाकडे वळले व माझ्या मते, त्यांना त्या बौद्ध विचारधारेत अनेक कठीण समस्यांची सोपी उत्तरे मिळत गेली.बुद्धाच्या निर्वाणानंतर लोकांनी त्याला ‘देव’ बनवून त्याची पूजा सुरू केली व त्याची मंदिरेही उभी केली असतील. परंतु, बुद्ध हा खर्या अर्थाने केवळ या भारत वर्षांतलाच नव्हे तर संपूर्ण जगातला, वैचारिक बजबजपुरीतून माणसाला वर उचलून घेणारा पहिला वहिला बुद्धीप्रामाण्यवादी - रॅशनॅलिस्ट होता. बुद्धाला आम्ही भगवान बुद्ध म्हणत असलो तरी त्यांनी चमत्कार, दृष्टांत असल्या प्रकारांना कधीच थारा दिला नव्हता. आत्मा, पुनर्जन्म असल्या गोष्टीचेही त्याने स्तोम माजविले नाही. वेदाचे सर्वश्रेष्ठत्व तर बुद्धाने मुळातच नाकारले. वर्णाश्रम पद्धतीला तर अगदीच फाटा दिला. बुद्धाने व्यक्तिगत तसेच सामुदायिक जीवनांतील नीतीमूल्यांवर भर दिला. मी देवाचा पुत्र, प्रेषित किंवा अवतार असल्या भाकडकथा तर बुद्धाने कधीच सांगितल्या नाहीत. देवत्वाचे स्तोम तर कधीच माजविले नाही. नारायण देसाईना हा बुद्ध मनापासून आवडला. त्यांच्यातील मार्क्सवादी विचारधारेला हा बुद्ध अधिक जवळचा वाटला आणि एका हातात मार्क्स व दुसर्या हातात बुद्ध म्हणावा अशा प्रकारे ते अगदी सखोलपणे बुद्धाचा मागोवा घेत गेले. केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञानच नव्हे तर राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नाचा व मूल्यांचाही ते बौद्ध विचारसरणीच्या प्रकाशांत विचार करू लागले. यातूनही त्यांचे अप्रतिम असे ‘बुद्ध आपुला सांगाती’ हे पुस्तक निर्माण झाले. त्यापूर्वी त्याचे प्रखर बुद्धीप्रामाण्यवर भर देणारे ‘ईश्वर नव्हे मीच खरा’ हे विचारपरिप्लुत असे पुस्तक आले होते. ही दोन्ही पुस्तके देसाईंना आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेवटी शेवटी लिहिली. म्हणजे सत्तरी उलटल्यावर एखाद्या नव्या दमाच्या तरुणालाही लाज वाटावी अशा उमेदीने ते नव्या प्रकारच्या विचारांची मांडणी करू लागले होते. नारायण देसाई हे कम्युनिस्ट चळवळींतून पुढे आलेले असल्यामुळे ते इतर कम्युनिस्टांसारखेच ‘कॉमे्रड’ होते. परंतु हा कॉमे्रड पोथीनिष्ठ-डॉग्मॅटिक नव्हता. ते प्रखर असे बुद्धीनिष्ठ होते. तर्कनिष्ठ होते, हे त्यांनी आपल्या विचारांना जी नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यावरून नि:संदेह सिद्ध होते.
नारायण देसाईंनी विपुल लेखन केले. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. या पुस्तकांमध्ये लेनिनचे चरित्र आहे. लेनिनचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना आकलन करून देणारी ग्रंथरचना त्यांनी केली.‘शास्त्रीय तत्त्वज्ञान’सारखा विचारवंतांनी गौरविलेला ग्रंथ लिहिला. दत्ता बाळ नावाचे बुवा-बाबांच्या परंपरेतले एक तथाकथित उपदेशक होऊन गेले. तरुण वयातच त्यांचे निधन झाले. अध्यात्मिकतेच्या नावाखाली हा माणूस नुसता वैचारिक गोंधळ माजवीत सुटला होता. या गोंधळलेल्या विचारसरणीची चिरफाड करण्याच्या निमित्ताने नारायण देसाईंनी ‘समाजक्रांतीच्या प्रकाश रेषा’ हा ग्रंथ लिहिला. विद्वजनांनी या ग्रंथाचेही फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.
नारायण देसाईंनी मराठीबरोबरच कोंकणीतूनही लिहिले. कोंकणीतून त्यांनी लिहिलेले लेनिनचे चरित्र हा एक महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. गोवामुक्तीपूर्वी, मुंबईत ‘साळीक’(कमळ) नावाचे एक मासिक प्रकाशित होत असे. शंकर भंडारी, कृष्णा करवार, लक्ष्मीदास बोरकर यांच्यासह नारायण देसाईही त्या मासिकाचे एक संपादक होते. देसाईनी गोवा मुक्तीसंग्रामातही भाग घेतला होता. त्यासाठी तुरुंगवासही भोगला होता. गोवा मुक्तीनंतर गोव्यात कम्युनिस्ट चळवळीबरोबरच अन्य सहकार्यांसमवेत शेतकरी-कामगार संघटना उभारणीचेही कार्य त्यांनी केले. देसाई हे केवळ चिंतक-विचारकच नव्हते. सर्वसामान्याच्या हातात हात घालून, अन्यायाविरुद्ध लढणारे ते एक आदर्श कर्मयोगीही होते. गोव्यात आज कामगार चळवळ शिल्लक असेल तर तिच्या मुळाशी नारायण देसाईंसारख्याचे श्रम आहेत हे विसरता येणार नाही. असे हे देसाई 1970 नंतरच्या काळांत गोव्यातून पुन्हा मुंबईला गेले. काही काळ तेथे राहिल्यानंतर त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. परंतु पुणे त्यांना मानवेना. ते परत मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत ते ‘थिंकर्स अकादमी’ पासून अनेक समाजोपयोगी उपक्रमांत व्यस्त राहिले. अलिकडेच ते मुंबई सोडून परत पुण्याला रहायला आले होते. शरीर साथ देत होते तोपर्यंत ते अधूनमधून गोव्याला येत असत. ते आले म्हणजे त्यांच्याबरोबर काम केलेले जुने कार्यकर्ते, मित्रमंडळी व त्यांचे चाहते यांची लगेच बैठक जमे. प्रत्येक वेळी त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही ना काही असेच. नारायण देसाईंनी आपल्या हयातीत अनेक जाहीर सभांतून भाषणे केली. अनेक विषयांवर व्याख्याने दिली. परंतु खरे नारायण देसाई खुलायचे ते बैठकसदृश्य सभांतून उपस्थिताशी स्नेहसंवाद साधताना. अशावेळी त्यांच्या वाणीला एक वेगळाच रंग चढे. विचाराची धार अधिक प्रखर होई. एकांतून दुसरा, दुसर्यांतून तिसरा अशी अपूर्व विचारमालिकाच सुरू होत असे. नारायण देसाई हे खरे म्हणजे या गोमान्तभूमीत जन्मलेले एक महान व्यक्तिमत्व. परंतु त्या व्यक्तिमत्वाची गोमंतकीयांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती तेवढी ती घेतली नाही. कारण स्वत:च्याच विश्वात दंग असलेेेले गोमंतकीय त्यांना कधी ओळखूच शकले नाहीत.
-नागेश करमली
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व साहित्यिक