“फ्रॉइड काय, मार्क्स काय, नेहरू काय किंवा इतर विचारवंत काय, सर्वाचेच विचार कालग्रासितच असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतु अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’’ - कॉ. नारायण देसाई
कॉ. नारायण देसाई यांची नियतकालिके

कॉ. नारायण देसाई यांनी साम्यवादी विचारांना वाहिलेली काही पत्रे गोव्यात सुरु केली. त्यात ‘लोकसंग्राम’ हे साप्ताहिक होते. ते 26 सप्टेंबर 1965 रोजी सुरु झाले. मडगाव येथून निघणारे हे साप्ताहिक तसे अल्पजीवीच ठरले. मग त्यांनी 1970 साली ‘लोकभारत’ हे पाक्षिक पणजी येथून सुरू केले. ते 1977 पर्यंत चालू होते. त्याचे कार्यकारी संपादक म्हणून रमेश कोलवाळकर हे काम पहात. ‘लोकभारत’ आठ पृष्ठांचे असे. त्याचा दिवाळी अंक मात्र भरघोस आणि दर्जेदार निघे. हे नियतकालिक पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यात मार्क्सवादी विचारवंतांचे लेख येत. दिवाळी अंकात कथा, कविता असे ललित साहित्य असे.
या लोकभारतचे पुढे 1982 साली नामांतर होऊन ‘लोकभूमी’ निघू लागले तेही पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यावर कार्यकारी संपादक म्हणून रमेश कोलवाळकर यांचे नाव असते.

(रवींद्र घवी, गोमंतकीय मराठी वाङमयाचा इतिहास (2))