“फ्रॉइड काय, मार्क्स काय, नेहरू काय किंवा इतर विचारवंत काय, सर्वाचेच विचार कालग्रासितच असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतु अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’’ - कॉ. नारायण देसाई




आणखी थोडी साहित्यविषयक व चरित्रविषयक माहिती


1. नारायण देसाई हे साम्यवादी बनले असले तरी ते एका खानदानी देसाई घराण्यात जन्मले होते.

2. लेत्रश (आर्टस्) कोर्स घेतल्यामुळे पोर्तुगीजप्रमाणेच फ्रेंच, इंग्रजी व लॅटीन भाषांचा त्यांचा चांगलाच अभ्यास झाला.

3. सन 1943 पर्यंत शिक्षण घेतल्यावर मुंबईच्या सेंट अ‍ॅन्ड्रूज हायस्कूलमध्ये नोकरी धरली. तिथे ते लॅटीन भाषा शिकवीत.

4. पोर्तुगीज भाषेत त्यानी आपला पहिला लेख लिहिला. 1939 साली प्रा. मेसियश गॉमिस यांच्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या ‘ऊ एराल्द’ दैनिकात त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. गणपती स्वर्गात राहाणारा देव नसून खरा योद्धा होता, वेदकालीन एका गणांचा नायक होता आणि तिबेटवर स्वारी करून तो प्रदेश त्याने मुक्त केला; असे विचार पं. सातवळेकरांनी मांडले होते. त्यांचा अनुवाद करून देसाईनी तो लेख लिहिला होता.

5. मुंबईला गेल्यावर त्यांनी ‘कंगाल भारत’ नाटक लिहिले. आंतरजातीय प्रेमसंबंधांवर आधारित हेेे नाटक होते. नंतर त्यांनी सुभाषबाबूंच्या जीवनावर ‘क्रांतिवीर’ नाटक लिहिले. दोन्ही नाटके 1947 साली प्रसिद्ध झाली.

6. सन 1955 साली कॉ. देसाईंची काँ. डांगेंशी ओळख झाली. ते पक्षाच्या ‘युगांतर’ साप्ताहिकात लिहू लागले.

7. काही सहकार्‍यांच्या मदतीने ‘साळीक’(कोकणी) अमर शेख यांच्या सहकार्याने ‘युगदीप’ ही कालिके त्यानी काही काळ चालवली, सावंतवाडीला ‘आमचे श्रम आमचे राज्य’, बेळगावला ‘लोकसंग्राम’, पणजीहून ‘लोकभारत’ कालिक काढले.

8. सन 1962 ते 1975 या काळात त्यांनी सहा पुस्तके लिहिली. त्यात ‘लेनीन : जीण आनी कतृत्व’ हे कोंकणी चरित्र होते. त्याशिवाय,  शास्त्रीय तत्त्वज्ञान (1962), मार्क्सवाद-लेनीनवादाची मूलतत्त्वे (1964) आणि समाजक्रांतिच्या प्रकाशरेखा (1972) ही पुस्तके महत्त्वाची होती.

9. ‘मार्क्सवाद-लेनीनवादाची मूलतत्त्वे’ या पुस्तकाला गोमंतक साहित्य संमेलनाच्या सन 1965च्या म्हापसा अधिवेशनात सुवर्णपदक मिळाले होते.

10. ‘लेनीन : जीण आनी कतृत्व’ या पुस्तकास कला अकादमीचा पुरस्कार लाभला.

11. भुमिगत असतानाच्या काळात देसाईंनी ‘मार्क्सवादच का ?’ हा ग्रंथ सूदनचंद्र या टोपण नावाने लिहिला होता.

12. ‘लेनिन आणि आपण’ हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहिले. ‘या ग्रंथाने भारतीय साम्यवादी वैचारिक ग्रंथात एक मोलाची भर घातली आहे.’ असे बा.द.सातोस्कर म्हणतात.

13. त्यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत ‘मार्क्सवाद व अस्तित्ववाद’ या विषयावर भाषण झाले तेव्हा अध्यक्ष वसंतराव तुळपुळे यांनी देसाई हे कोसंबी पितापुत्रांच्या व्यासंगी परंपरेतील गोमंतकीय वक्ते आहेत असे म्हटले होते.

14. गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी 23 डिसेंबर 1961 या दिवशी दिवाकर काकोडकर, नारायण देसाई प्रभृति मंडळीनी पेडणे तालुक्यातील तुयें गावी गोवा किसान संघ स्थापन केला. मुक्त गोव्यातली ही पहिली संघटना.

15. सन 1964 साली कम्युनिस्ट पार्टीच्या नॅशनल कौन्सिलवर नारायण देसाईंची नियुक्ती झाली.

16. ‘लेनिनचा मटीरियलिझम व एंपीरियोक्रिटीसिझम’ असा एक तत्त्वज्ञानपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथातील काही विचारांची चर्चा मराठीत प्रथम देसाई यांनी केली आहे असा अभिप्राय पां. वा. गाडगीळ यानी दिला आहे.

17. नारायण देसाई यांचे साहित्य, कार्य व नेतृत्व विचारात घेऊन त्यांना ‘सोविएत लॅण्ड’चे नेहरू पारितोषिक दोन वेळा प्रदान करण्यात आले व ते स्वीकारण्यासाठी दोन्ही वेळा ते मॉस्कोला गेले.

18. पूर्व जर्मनीला भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पत्रकार मंडळीचे प्रतिनिधी मंडळ गेले होते त्यांतही त्यांचा समावेश झाला होता.

(संदर्भ : गोमंतकीय साहित्याचे आधुनिक शिल्पकार)